तळोजातील पाणी प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष
पनवेल(प्रतिनिधी) तळोजा येथील नागरी वसाहत तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून तळोजातील पाणी प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.
नवी मुंबई सिडको हद्दीतील तळोजा (ता.पनवेल, जि.रायगड) वसाहतीमध्ये अनेक महिन्यांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना दैनंदिन कामात अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे माहे डिसेंबर २०१९ मध्ये निदर्शनास आले आहे. या वसाहतीतील नागरिकांनी अनियमित व कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत सिडको प्रशासनाविरोधात मोर्चाही काढला होता तसेच अनेक गृहनिर्माण संस्थांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी इमारत नो वॉटर नो वोट अशा प्रकारचे फलक लावून संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर पाण्याअभावी येथील औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने बंद पडले. या सर्व प्रकरणाची शासनाने चौकशी करून तळोजा येथील नागरी वसाहती तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये नियमित व सुरळीत पाणी पुरवठा होण्याबाबत कोणती उपाययोजना व कार्यवाही केली, असा तारांकित आमदार प्रशांत ठाकूर मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल केला होता.
या प्रश्नावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हंटले आहे कि, नवी मुंबई सिडको हद्दीतील तळोजा (ता.पनवेल, जि.रायगड) वसाहतीमध्ये अनेक महिन्यांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना दैनंदिन कामात अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे माहे डिसेंबर २०१९ मध्ये निदर्शनास आल्याचे आणि पाणीपुरवठ्याबाबत सिडको प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात आल्याची बाब खरी आहे.
नवी मुंबईमधील तळोजा रहिवासी वसाहतीला करण्यात येणारा पाणीपुरवठा हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तळोजा औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठा वितरण प्रणाली मधून करण्यात येतो.सद्यस्थितीत, तळोजा रहिवासी वसाहतीतील लोकसंख्येला अंदाजे ६ द.ल.ली.प्र.दि. पाणी पुरवठ्याची आवश्यकता आहे. सिडकोच्या निवासी वसाहतीमध्ये वाढ झाल्यामुळे वाढीव आकाराच्या नळजोडणीच्या अनुषंगाने सुमारे ८ द.ल.ली.प्र.दि. पाणी पुरवठाकरिता ४०० मि.मी. व्यासाची नळजोडणी मंजुर करण्यात आलेली आहे.
तथापि, राष्ट्रीय हरित लवादाने त्यांचे दि.०३.०९.२०१९ च्या आदेशानुसार संयुक्त सांडपाणी प्रक्रिया केंद्राला (सी.ई.टी.पी.) औद्योगिक विकास महामंडळाने अंदाजे ३० ते ३५ टक्के पाण्याची कपात केल्याने त्याचा परिणाम नागरी वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर ही झालेला आहे. तसेच नागरी वसाहतीसाठीचे औद्योगिक वसाहतीतील नळजोडणी ठिकाण ते सिडको निवासी क्षेत्र हे अंतर सुमारे ४ ते ५ कि.मी. असल्याने पाणी पुरवठा कमी दाबाने होतो.राष्ट्रीय हरित लवाद यांनी त्यांचे दि.०३.०९.२०१९ आदेशान्वये औद्योगिक वसाहतीतील संयुक्त सांडपाणी प्रक्रिया केंद्राला (सी.ई.टी.पी.) फक्त १० द.ल.ली.प्र.दि. सांडपाणी घेण्याबाबत मर्यादा घालण्यात आली होती.
त्यानुसार सांडपाणी निर्माण करणा-या कंपन्यांना दि.०६.०९.२०१९ रोजी पाणी कपातीच्या नोटीसा देऊन दि.०७.०९.२०१९ ते दि.२४.१०.२०१९ या कालावधीत पाणी कपात करण्यात आलेली होती. तळोजा वसाहतींना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे वितरण व्यवस्थेमध्ये बदल करुन तसेच झोनिंग करुन १ दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते आणि नजिकच्या खारघर सेक्टर २६ येथील जलकुंभातून देखील पाणी पुरवठा करण्यात आला होता. तद्नंतर मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दि.२१.१०.२०१९ रोजीच्या आदेशानुसार औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांची पाणी कपात रद्द करुन दि.२४.१०.२०१९ पासून औद्योगिक क्षेत्रातील व नागरी वसाहतीतील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू आहे.